सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून मान्सून जोर पकडणार! महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मध्यम ते हलका स्वरुपाचा पाऊस

Foto
मुंबई  : बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा जमिनीच्या आत सरकत असल्याने मान्सूनच्या पावसाचा जोर आणखी वाढू शकतो. त्यामुळे सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये पूर्व आणि उत्तर भारतात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे. दरम्यान, महाराष्ट्रातही काही जिल्ह्यात मध्यम ते हलका स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
 
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या गांगेय पश्चिम बंगाल आणि लगतच्या उत्तर किनारपट्टीय ओडिशा तसेच उत्तर-पश्चिम बंगालच्या उपसागरावर असलेला हा कमी दाबाचा पट्टा पश्चिम-उत्तर-पश्चिम दिशेने सरकण्याची शक्यता आहे.

मान्सून शेवटच्या महिन्यात प्रवेश करत असताना या प्रणालीच्या प्रभावामुळे पूर्व आणि मध्य भारतातील अनेक भागांत पाऊस सुरू राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा अंदाज
महाराष्ट्रातील पूर्व विदर्भ, मराठवाड्यातील काही भागात मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, बीड, गोंदिया, गडचिरोली, अमरावती, नागपूर, भंडारा या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह मध्यम ते हलका पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

मान्सूनच्या शेवटच्या महिन्याला सुरुवात
सध्या तयार होत असलेली पावसाची ही मालिका महत्त्वाची आहे, कारण सप्टेंबर हा भारतातील मान्सूनचा शेवटचा महिना असतो. संपूर्ण देशात एकाच वेळी पाऊस पडण्याऐवजी, ताज्या अंदाजानुसार केवळ काही प्रदेशांतच मान्सूनचा जोर पुन्हा वाढेल; ज्यामध्ये पूर्व, मध्य आणि उत्तर भारताच्या काही भागांना पावसाचा फायदा होऊ शकतो.